चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी
१. तरुणांना उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करुन देऊन त्यांचे स्थलांतरण रोखणे
२. शेतीपूरक जोडधंद्यांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना सक्षम करणे
३. व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी निर्माण करणे
४. दर्जेदार आरोग्य सुविधा उभी करणे
५. मतदारसंघातील सर्व रस्ते दर्जेदार व खड्डेमुक्त करणे
६. मतदारसंघातील दळणवळणाच्या सुविधा सक्षम करणे
७. मतदारसंघातील दुर्गम भागात सर्व मोबाईल कंपनीची कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करणे
८. मतदारसंघातील शहरी भागात नागरी सुविधांचा दर्जा सुधारणे
९. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे
१०. आपल्या मतदारसंघातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वाड्या-वस्त्यावरील शिक्षणाच्या सुविधा सक्षम करणे
११. गावखेड्यांत एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे
१२. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेणे
१३. ग्रामीण भागातील शेतीचे जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना
१४. चिपळूणला रेल्वेमार्गाने क-हाड-कोल्हापूरशी जोडण्याबाबत पाठपुरावा करणे
१५. ग्रामीण व दुर्गम भागातील प्रत्येक पीएचसी मध्ये सर्पदंश, श्वानदंश यांसह इतर सर्व प्रकारच्या लसी आणि औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध रहावी याकडे लक्ष देणार
१६. चिपळूण-संगमेश्वर भागातील आरोग्यसेवा अधिकाधिक सक्षम व्हाव्यात याकडे लक्ष देणार
१७. चिपळूण-संगमेश्वर भागातील पर्जन्यमान लक्षात घेता येथील धरणांतून होणाऱ्या विसर्गाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन वर्षभराचे पाणी साठवण करण्याबाबत उपाययोजना करणार.
१८. मतदारसंघातील आंबा, काजू, कोकम आदी खास कोकणातील रानमेव्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणार

गेली दोन दशकांहून अधिक काळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना कोकणातील माणसाला रोजगारक्षम कसे करता येईल यावर आम्ही सर्वजण काम करीत आहोत. याचाच एक भाग म्हणून 'वाशिष्ठी डेअरी' सारखा एक दर्जेदार प्रकल्प आपण चिपळूण शहराच्या जवळ पिंपळी खुर्द येथे उभारला. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणाच्या कणाकणात असणारे चैतन्य पुढे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शेकडो शेतकरी कुटुंबाना या माध्यमातून जोडधंदा व शाश्वत रोजगार मिळाला याखेरीज काही प्रमाणात का होईना पण रोजगारासाठी शहराकडे होणारे स्थलांतर आम्ही थोपवू शकलो याचे समाधान आहे.
येथील शेतकरी शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हावा यादष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत. खेर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच आणि सरपंच म्हणून काम करताना या परिसरातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकरी, छोटे व्यावसायिक, महिला, तरुण यांचे सामाजीक तथा आर्थिक उत्थान व्हावे यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा सदैव प्रयत्न केला आहे. याखेरीज राजकीय क्षेत्रात काम करीत असताना तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावांत संपर्क ठेवण्याकडे माझा कटाक्ष आहे. आपल्या कोकणाच्या भूमीचा विकास व्हावा, येथे रोजगार, शिक्षण, आरोग्य यांच्या सर्वोत्तम सुविधा निर्माण व्हावा यासाठी मी अविरतपणे काम करीत आहे.
यासाठीच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मी निर्धार केला असून 'राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार' पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूकीला सामोरे जात आहे.
बंधू आणि भगिनींनो, आपणास माहितच आहे की, आपल्या कोकणच्या भूमीने नेहमीच स्वाभिमानी विचारांचा आग्रह धरताना सत्य, न्याय आणि निष्ठेची पाठराखण केली आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर झालेले प्रहार झेलण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी कोकणातील शिलेदारांनी शर्थ केली हा इतिहास आहे. याच इतिहासाची आता पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे. कोकणाचा विकास, रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण यासोबत महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम राखण्यासाठी आपण माझ्या 'तुतारी वाजविणारा माणूस' या चिन्हासमोरील बटण दाबून मला विजयी करावे आणि आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद.