आपली माती, आपली माणसं आणि आपली संस्कृती ही त्रिसूत्री केंद्रबिंदू ठेऊन कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र परिश्रम करीत आहे. त्याच भावनेतून दरवर्षी वाशिष्टी कृषी व पशुधन प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. शिवाय, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी महिला मेळावे, आरोग्य शिबीरे, छत्री व रेनकोट वाटप, शालेय साहित्य वाटप, दहीहंडी स्पर्धा, रक्षाबंधन, गणपती व नवरात्र उत्सव, पालखी नृत्य स्पर्धा, क्रिकेट व कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात माझा नेहमी पुढाकार असतो. तसेच शेतकरी बांधवांसाठी कृषी मेळावे, बियाणे वाटप, मुक्या जनवारांसाठी उपचार शिबीरे, नांगरणी स्पर्धा असेही उपक्रम सातत्याने घेत आहे. तरीही माझ्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्न, शेतीविषयक समस्या, पायाभूत सुविधा, दळणवळणासाठी चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षणासह पाण्याचे प्रश्न, तरूणांसाठी रोजगार, महिला बचत गटांना विविध संधी तसेच विविध घटकांचे प्रश्न, अडचणी व समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द आहे.
आपल्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माझी माय-बाप जनता कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळेच सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात मला थोडेफार काम करता आले. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून दूध समूह उभारता आला. त्यातून हजारो हातांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे माझ्या आजपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात सर्वसामान्य कोकणकरांनी मोलाची साथ दिली आहे. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आली. त्यामध्ये आपला थोडक्यात पराभव झाला. परंतु, त्या काळात सर्वसामान्य जनतेने दिलेली साथ, सहकार्य, प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. कारण, चिपळूण आणि संगमेश्वरसह संपूर्ण कोकणवासीयांचे माझ्यावर निस्वार्थी प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्याशी माझे आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते आहे.
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ हा नैसर्गिक संपन्नतेसह अनेक विकासाच्या संधींनी भरलेला आहे. येथे रोजगार निर्मिती, शैक्षणिक उन्नती, पर्यटन विकास, शेतीसाठी आधुनिक साधनसुविधा आणि जलसंपत्तीचा शाश्वत वापर या सर्व क्षेत्रांत प्रगती साधणे हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी 'स्वप्न तेचं, दिशा नवी' हा विचार केंद्रबिंदू ठेऊन देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच मुख्यमंत्री माननीय श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनात आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन आपल्या कोकणात भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्यासाठी धोरणात्मक नियोजन आखून कृतीशील कार्यक्रम हाती घेण्याचा मानस आहे. शिवाय, केंद्र व राज्य सरकारच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर आपला भारतीय जनता पक्ष चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासह अवघ्या रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी आणि घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प आहे. त्यामुळे आपले प्रेम, प्रोत्साहन, साथ, सोबत, पाठबळ आणि आशीर्वादाची गरज आहे. चला, विकासाच्या दिशेने पाऊल टाकूया आणि प्रेम-जिव्हाळ्याचे हे नाते कायम जपूयात.

